जनतेला कोडे घालत फडणवीसांच्या सौभाग्यवतींचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल


मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून या ना त्या प्रकारे टीका केली जात आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील काही मागे नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यादेखील वारंवार राज्य सरकारवर त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असल्याचे पाहायला मिळते. मिसेस फडणवीस यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी एक कोडे घातले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे, ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचे काहीच काम होत नाही. महामारीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचे फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अनेकांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक प्रतिक्रिया या टीकात्मक असल्याचे पाहायला मिळत आहे.