भारत पाक संबंधातील तेढ कमी- मोदी- इम्रान भेटीची शक्यता?

भारत पाकिस्तान या दोन देशांच्या संबंधातील तेढ हळूहळू कमी होत असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची या वर्षात भेट होण्याची शक्यता असल्याचा दावा ब्रिटीश वृत्तपत्र फायनान्शीयल टाईम्सने केला आहे.

यात असे म्हटले गेले आहे की भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारावे यासाठी तत्पर असून मोदी- इम्रान खान भेटीसाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा प्रयत्नशील आहेत. ते अनेक भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. भारत पाक संबंधातील दरी भरून यावी यासाठी युएई सुद्धा मध्यस्ती करत आहे. युएईचे शासक मोहम्मद बिन जायद अल नहयात यांनी यात पुढाकार घेतल्याचेही सांगितले जात आहे. त्यांच्याच प्रयत्नातून २५ फेब्रुवारीला भारत-पाक सीजफायर लागू झाल्याचा दावा केला जात आहे.

पाक लष्कर प्रमुख बाजवा आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मध्येही चर्चा झाल्याचा दावा यात केला गेला आहे. ही प्रक्रिया करोना मुळे देशांची अर्थव्यवस्था कोलमडल्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मनाली जात आहे. मोदी-इम्रान खान भेटीसाठी उच्चस्तरीय अधिकारी पातळीवरही चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. भारताने जम्मू काश्मीरसाठीचे विशेष कलम ३७० रद्द केल्यापासून बाजवा भारताबरोबर चर्चा करण्यासाठी कासावीस झाले आहेत. पाकिस्तानने भारताकडून साखर आणि कापूस आयातीचा घेतलेला निर्णय याचे उदाहरण म्हणून दिला जात आहे. मात्र स्थानिक दबावामुळे इम्रान खान याना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.