फोर्ब्सची भारतीय धनकुबेर यादी, अंबानी अग्रणी, पूनावाला प्रथमच पहिल्या दहात

फोर्ब्सने भारतीय धनकुबेरांची यादी जाहीर केली असून त्यात रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ६.२७ लाख कोटी आहे. विशेष म्हणजे या यादीत सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील झाले आहेत. तसेच सन फार्मास्युटीकलचे दिलीप संघवी सुद्धा पहिल्या दहात सामील आहेत.

या यादीत गौतम अडाणी दोन नंबरवर आहेत. त्यांची संपत्ती ३.७५ लाख कोटी आहे. त्यांनी यावेळी डीमार्टचे राधाकिशन दमाणी याना मागे टाकले आहे. राधाकिशन दमाणी या यादीत चार नंबरवर आहेत. तीन नंबरवर एचसीएलचे संस्थापक नाडर असून त्यांची संपत्ती आहे १.७४ लाख कोटी.

या यादीत दहाव्या नंबरवर सुनील मित्तल आहेत. त्यांची संपत्ती ७८.१२ हजार कोटी आहे. विशेष म्हणजे करोना काळात सुद्धा भारतात अब्जाधीश संख्या वाढली आहे. ही संख्या यंदा १४० वर गेली असून गेल्या वर्षी १०२ अब्जाधीश होते. या सर्व अब्जाधीशांची संपत्ती एकत्र केली तर ती ५९६ अब्ज डॉलर्स म्हणजे ४४.२८ लाख कोटी इतकी आहे.

मुकेश केवळ भारतातील नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत. अडाणी यांच्या संपत्तीत पाच पट वाढ झाली आहे आणि जगातील श्रीमंत यादीत ते २० व्या स्थानावर पोहोचले आहेत.