पंतप्रधानांनी कोविड १९ लसीचा दुसरा डोस घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स मध्ये जाऊन स्वदेशी कोविड लस कोवॅक्सिनचा दुसरा डोस गुरुवारी सकाळी घेतला. मोदींनी या लसीचा पाहिला डोस १ मार्च रोजी घेतला होता. दुसरा डोस घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवरून शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘आज कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा एक उपाय आहे. आपण लसीकरणासाठी योग्य असाल तर लवकर लस घ्या.’

मोदी यांना दुसरा डोस पुडुचेरीच्या सिस्टर पी निवेदा यांनीच दिला. पाहिला डोस सुद्धा याच सिस्टरनी दिला होता. दुसऱ्या डोसच्या वेळी निवेदा याच्यासोबत पंजाबच्या सिस्टर निशा शर्मा होत्या.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, अमेरिकेला मागे टाकून भारताने सर्वाधिक वेगाने कोविड लसीकरण करणारा देश म्हणून आघाडी घेतल्याचे जाहीर केले आहे. भारतात रोज ३०,९३,८६१ जणांना लस दिली जात असून आत्तापर्यंत ८,७०,७७,४७४ जणांना लस दिली गेली आहे. त्यात ८९,६३,७२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर ५३,९४,९१३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला गेल्याचे म्हटले आहे. ६० वर्षांच्या वरील ३,५३,७५,९५३ जणांना पहिला तर १०,००,७८७ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. ४५ ते ६० वयोगटातील २,१८,६०,७०९ जणांना पहिला तर ४,३१,९३३ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे.