नेत्रा कुमारन बनली ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी पहिली भारतीय नौकानयनपटू

भारताची नौकानयनपटू नेत्रा कुमारन हिने बुधवारी ओमान येथे इतिहास रचला आहे. तिने टोक्यो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय केले असून २३ वर्षीय नेत्रा ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी पहिली भारतीय महिला नाविक बनली आहे. ओमान येथील आशियाई क्वालिफायच्या लेजर रेडियल स्पर्धेत तिने प्रतिस्पर्धी भारताच्याच रम्या सरवनन हिच्यावर २१ अंकांची बढत घेऊन पाहिले स्थान पटकाविले. गुरुवारी या स्पर्धेतील अंतिम फेरी होणार असली तरी नेत्राची ऑलिम्पिक एन्ट्री नक्की झाली आहे.

चेन्नई च्या नेत्राचे मुसानाह ओपन चँपियनशिप मध्ये १९ अंक आहेत तर आशियाई आणि आफ्रिकन ऑलिम्पिक क्वालिफाय मध्ये ३९ अंक आहेत. लेझर रेडियल ही सिंगल हँडेड बोट असून त्यात एकच नाविक असतो. आशियाई नौकानयन महासंघाचे अध्यक्ष मलव श्रॉफ म्हणाले, गुरुवारच्या अंतिम स्पर्धेपूर्वीच नेत्रा ऑलिम्पिक साठी क्वालिफाय झाली आहे. श्रॉफ यांनी स्वतः २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक नौकानयन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

नौकानयन ऑलिम्पिक साठी क्वालिफाय करणारी नेत्रा पहिली भारतीय महिला असली तर या खेळाच्या एकूण यादीत ती १० वी आहे. यापूर्वीचे नउ खेळाडू पुरुष होते.