कवडी मोलाच्या चीपने उद्योग क्षेत्र केले ठप्प

जगात करोना मुळे अनेक उद्योग संकटात सापडले आहेतच पण एका कवडी मोलाच्या चीपने ऑटो, गॅझेट उद्योगांना वेठीला धरले असल्याचे समोर आले आहे. ४५० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेला सेमीकंडक्टर उद्योग या चीप मुळे संकटात आला आहे. याचे मुख्य कारण आहे डिस्प्ले ड्रायव्हर चीपची चणचण. १ डॉलर म्हणजे साधारण ७५ रुपये किमतीची ही चीप आज मौल्यवान ठरली आहे.

सेमीकंडक्टर व्यवसायातील जाणकार सांगतात, विविध प्रकारच्या शेकडो चिप्स मिळून चांगल्या दर्जाचा सेमीकंडक्टर बनतो. चांगल्या दर्जाच्या चिप्सचा पुरवठा क्वालकॉम इंक, इंटेल कॉप कंपन्याकडून केला जातो. या चिप्स संगणक, स्मार्टफोन, ऑटो क्षेत्रात तसेच गॅजेट उत्पादनात वापरल्या जातात. चीन आणि तैवान हे यांचे प्रमुख उत्पादक आहेत. या चिप्स डिस्प्ले ड्रायव्हरची भूमिका पार पाडतात. मॉनीटर, नेव्हिगेशन सिस्टिमला बेसिक माहितीची सूचना स्क्रीनला देणे हे यांचे काम.

मागच्या वर्षी करोना मुळे या चिप्सची गरज असलेल्या उद्योगांनी मागणी कमी राहणार म्हणून उत्पादन कमी केले पण आता या चिप्सना मागणी वाढली असून मागणीच्या मानाने पुरवठा होऊ शकत नाही. ज्या कंपन्या या चिप्स बनवितात त्या मागणीच्या प्रमाणात उत्पादन करू शकत नसल्याने टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी त्यांच्या किमती वाढल्या आहेत.

लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले पॅनल्स सुद्धा यामुळे महाग झाली आहेत. या पॅनल्सचा वापर टीव्ही, लॅपटॉप,कार, विमाने, रेफ्रिजरेटर मध्ये होतो. त्यांना पॉवर मॅनेजमेंट चिप्सची चणचण जाणवू लागली आहे. याचा थेट परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. फोर्ड, निसान, फॉक्सवॅगन, किया, ह्युंदाई कंपन्यांनी त्यांचे उत्पादन कमी केले आहे. जगातील कार उद्योगाचे या चिप्स मिळत नसल्याने ६० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समजते. त्यातून चीन या चिप्सची कृत्रिम टंचाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.