किम जोंगच्या देशात अद्याप एकही कोरोनाबाधित नाही


सेऊल – उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे आमच्या देशात अद्यापही कोरोना महामारीचा प्रवेश आम्ही होऊ दिला नसल्याचा दावा केल्याचे वृत्त समोर आले आहे. जगभरात एक वर्षापुर्वी कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला, पण अद्यापपर्यंत आमच्या देशात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहे.

यावर उत्तर कोरियाने या महामारीवर आपण कसे नियंत्रण मिळवले आहे याचा तपशील देताना म्हटले की, आमच्या देशाची सीमा आम्ही पुर्ण बंद केली आहे. त्याचबरोबर आमच्या देशातील विदेशी पर्यटक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देशात घालवून दिले आहे. कोरोनाची लागण झाल्याचा ज्यांना संशय जरी आला तरी त्या हजारो लोकांना आम्ही विजनवासात पाठवले आहे.

चीनला लागूनच या देशाची सीमा आहे आणि उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा यथातथच आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचा हा दावा संशयास्पद असल्याचे काहींचे म्हणणे आहे. उत्तर कोरियात आत्तापर्यंत 23 हजार 121 रूग्णांची कोरोना संशयावरून चाचणी घेण्यात आली पण ती निगेटीव्ह आल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या उत्तर कोरियातील प्रतिनिधीने सांगितले.