‘इंडियन आयडॉल’चा स्पर्धक पवनदीप राजनला कोरोनाची लागण!


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाने मालिकांच्या सेटवरही शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमातील तब्बल 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर ‘इंडियन आयडॉल 12’चा सूत्रसंचालक आदित्य नारायण याला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या जागी सध्या दुसरा अभिनेता या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. खबरदारी म्हणून इंडियन आयडॉलमधील स्पर्धकांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात स्पर्धक पवनदीप राजन याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

एखाद्या कार्यक्रमात स्पर्धकाला कोरोनाची लागण होण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. यानंतर आता हा कार्यक्रम सुरु ठेवायचा की अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकायचा याचा विचार कार्यक्रमाचे मेकर्स आणि वाहिनीशी संबंधित लोक करत आहेत. पवनदीपला कोरोना झाल्यावर त्याच्याबरोबर राहणारे सर्व स्पर्धक क्वारंटाईन होतील की, शूटिंग सुरू राहील? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. स्पर्धकांव्यतिरिक्त इंडियन आयडॉलचे परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल दादलानी यांचीही दररोज कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. शोमध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांनाही सेफ्टी प्रोटोकॉलमधून जावे लागते.