मुंबई : गृहखात्याला मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अहवाल पाठवला असून परमबीर सिंह यांच्यावर यात ठपका ठेवण्यात आला आहे. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत, गृहखात्याला मुंबई पोलीस आयुक्तांचा अहवाल
सर्वसाधारण सहाय्यक पोलीस निरीक्षक असतानाही सचिन वाझे थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. ते इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट करायचे नाहीत. परमबीर सिंह यांच्या सांगण्यानुसार विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडे देण्यात आला होता. सचिन वाझेंच्या टीममधील व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती.
परमबीर सिंह यांच्याबरोबर हायप्रोफाईल प्रकरणात मंत्र्यांच्या ब्रिफिंग वेळी सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना सचिन वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, असे गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.