लडाखच्या आकाशात राफेलची गर्जना, हवाई दलाने शेअर केले फोटो

मंगळवारी भारतीय हवाई दलाने लडाख भागात उड्डाण करत असलेल्या राफेल लढाऊ विमानाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हवेतून हवेत मारा करणाऱ्या मिसाईलसह उड्डाण करत असलेल्या राफेल लढाऊ विमानाचे असे फोटो प्रथमच शेअर केले गेले आहेत. एमआयसीए मिसाईलसह हे विमान उड्डाण करत असलेले या फोटोत पाहायला मिळते आहे.

भारतीय हवाई दलाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे फोटो शेअर करताना ‘व्हेअर इगल्स डेअर’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोतून शेजारी देश पाकिस्तान आणि चीनला जणू भारताकडे वाकड्या नजरेने पाहू नका असा इशाराच दिला गेला आहे. गतवर्षी भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमाने सामील करण्यात आली आणि तेव्हापासून पाकिस्तान आणि चीन देशात बचैनी आहे.

भारताला फ्रांसच्या कंपनीकडून ३६ राफेल विमाने मिळणार आहेत. त्यातील १४ भारतात दाखल झाली आहेत. बाकी २०२२ पर्यंत येणार आहेत. या ३६ विमानात ३० लढाऊ राफेल आहेत तर ६ प्रशिक्षण राफेल आहेत.