व्हॉटस अप नाही, झुकेरबर्ग वापरतो सिग्नल मेसेजिंग सिस्टीम

१५० कोटी संदेश, फोटो, व्हिडीओ शेअर केले जाणाऱ्या व्हॉटस अप मेसेंजर अॅपचा सीईओ मार्क झुकेरबर्ग स्वतः मात्र प्रतिस्पर्धी सिग्नल मेसेजिंग अॅपचा वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. हा खुलासा फेसबुकच्या ५३ कोटी युजर्सचा डेटा लिक झाल्या प्रकरणी झाला असून सायबर सुरक्षा विश्लेषक डेव वॉकर यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला त्यात मार्क झुकेरबर्ग याचाही डेटा आहे. त्याचा फोन नंबर, पत्ता, लोकेशन, जन्मतारीख, लग्नाची माहिती, फेसबुक आयडी उघड झाला आहे. डेव यांनी स्वतःच्या फोन मध्ये मार्कचा फोन कॉन्टॅक्ट सेव करून सिग्नल अॅपवर त्याचा शोध घेतला तेव्हा मार्क सिग्नलचा वापर करत असल्याचे दिसून आले. स्वतःचा खासगीपणा जपण्यासाठी मार्क सिग्नलचा उपयोग करत असल्याचे उघड झाल्यावर डेव यांनी सोशल मीडियावर मार्कच्या सिग्नल अकौंटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे.

व्हॉटस अपचे नवे नियम जाहीर केल्यावर अनेक युजर्सनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युजर्स मोठ्या प्रमाणावर सिग्नल आणि टेलीग्राम या मेसेंजर अॅपकडे वळले आहेत आणि या दोन्ही अॅप्सने व्हॉटस अप पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. मार्क सिग्नलचा वापर करतो ही बाब त्याच्या कंपनीसाठी नुकसानीची ठरू शकणार आहे कारण त्याच्या कंपनीने युजर्सच्या खासगी माहितीचे महत्व सांगून सिग्नल आणि टेलीग्रामवर टीका केली आहे.

विशेष म्हणजे व्हॉटस अपने युजर्ससाठी नवी नियमावली आणल्यावर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी युजर्सना सिग्नल मेसेजिंग अॅपचा वापर करण्याचा सल्ला दिला होता आणि युजर्सनी त्याला इतका प्रतिसाद दिला की सिग्नलची रजिस्ट्रेशन साईट क्रॅश झाली होती.