यंदा एव्हरेस्ट चढाई साठी  ३०० गिर्यारोहकांना परवाना

या वर्षी नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्टसह अन्य सात शिखरांवर गिर्यारोहकांना जाण्यास परवानगी दिली असून एव्हरेस्ट साठी ३०० जणांना परवाना दिला गेला आहे. अर्थात करोना साथ लक्षात घेऊन त्यासाठी काही नियम पाळावे लागणार आहेत. करोना टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र, मास्कचा वापर आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. गेल्या वर्षी करोना मुळे माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहणासाठी नेपाळ सरकारने परवानगी दिली नव्हती. यामुळे देशाच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला होता.

नेपाळचे पर्यटन विभाग प्रमुख रुद्रसिंग तमंग म्हणाले, यंदा गिर्यारोहकांना परवानगी देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन आणि गिर्यारोहण यांचे मोठे योगदान आहे. तीन महिन्याच्या या काळात आमच्या अनेक नागरिकांची वर्षाच्या खर्चाची बेगमी होत असते. गतवर्षी ३ कोटी लोकसंख्येपैकी १५ लाख लोकांना बंदी मुळे रोजगार मिळाला नाही. शेरपा समुदायावर गावी बटाटे शेती करण्याची पाळी आली. त्यामुळे यंदा सुरक्षित गिर्यारोहण आणि पर्यटनाला परवानगी दिली गेली आहे.

एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर वैद्यकीय पथक तैनात असून ते संसर्ग झालेल्या गिर्यारोहक अथवा अन्य सहकाऱ्यांची काळजी घेणार आहे. १९ गिर्यारोहकांना घेऊन जाणाऱ्या पायोनियर या गिर्यारोहण एजन्सीचे एमडी लाक्या शेरपा म्हणाले यंदा करोना मुळे मोहीम सुरु होताना पार्टी नाही, गळाभेट घेणे नाही तर फक्त दुरुनच ‘नमस्ते’ केले जाणार आहे. मार्च ते मे हा गिर्यारोहणाचा काळ आहे.