बाहुबली डॉन मुख्तार अन्सारीच्या घराण्याचा असा आहे इतिहास

पंजाबच्या रोपड तुरुंगातून उत्तर प्रदेशातील बांदा तुरुंगापर्यंतचा बाहुबली आमदार मुख्तार अन्सारीचा प्रवास कडेकोट बंदोबस्तात पूर्ण झाला आहे. मंगळवारी दुपारी सुरु झालेला हा प्रवास बुधवारी संपला असून अन्सारींला बांदा तुरुंगातील १५ नंबरच्या बराक मध्ये ठेवले गेले आहे. येथे आणण्यापूर्वी अन्सारींची करोना टेस्ट केली गेली होती, ती निगेटिव्ह आली आहे असे समजते. अन्सारींच्या या प्रवासात पंजाब, हरियाना आणि चंदिगडचे पोलीस सतर्क राहिले होते. ९०० किमीचा हा प्रवास अत्यंत संवेदनशील मानला जात होता.

आमदार मुख्तार अन्सारींच्या नावावर किमान ५० मोठे गुन्हे आहेत. डॉन, माफिया, गँगस्टर अश्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्तार अन्सारींच्या घराण्याचा इतिहास मात्र गौरवशाली आहे याची अनेकांना माहिती नसेल. मुख्तार अन्सारीच्या वडिलांचे वडील म्हणजे मुख्तारचे आजोबा देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. आईकडचे आजोबा ब्रिगेडीअर मोहम्मद उस्मान यांना महावीरचक्र देऊन गौरविले गेले होते.

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे त्यांचे काका आहेत. राजकीय पार्श्वभूमी पहिली तर त्यांचा मोठा भाऊ खासदार तर दुसरा माजी आमदार आहे. मुख्तार अन्सारींचा मुलगा जगातील १० टॉप शुटर पैकी एक आहे. स्वतः मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्याच्या घराण्याचे मूळ गाव आहे उत्तर प्रदेशातील मऊ. पहिली निवडणूक त्यांनी बसपा कडून लढविली १९९६ साली. त्यानंतर २००२, २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये याच मतदारसंघातून ते निवडून आले. २०१० मध्ये बसप मधून त्यांची हकालपट्टी केली गेल्यावर त्यांनी कौमी एकता लीगची स्थापना केली पण २०१७ मध्ये ही लीग बसपा मध्ये विलीन झाली आणि मुख्तार पुन्हा २०१७ मध्ये बसपचे उमेदवार म्हणून पाचव्यावेळी निवडून आले आहेत.