जगातील महागडा तुरुंग ग्वांटानामो बे जेल पुन्हा चर्चेत

जगातला महागडा आणि अतिशय भयानक तुरुंग अशी प्रसिद्धी असलेला ग्वांटानामो बे जेल पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेत सत्ता परिवर्तन झाले की हा तुरुंग चर्चेत येतो. डोनल्ड ट्रम्प यांच्या नंतर अध्यक्षपदी आलेल्या जो बायडेन यांनी हा तुरुंग लवकरच बंद केला जाईल असे संकेत दिले आहेत. या तुरुंगातील एक सिक्रेट युनिट कॅम्प ७ यापूर्वीच बंद करून येथील कैद्यांना क्युबामधील अन्य एका अमेरिकन बेसवरील तुरुंगात हलविले गेले आहे.

कॅम्प सात हा अतिशय गुप्त असा कैदखाना मानला जातो. अमेरीकेवर झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन बुश सरकारने अफगाणिस्थान आणि इराक मधून व जगाच्या विविध भागातून पकडून आणलेले दहशतवादी येथे ठेवले होते. २००२ मध्ये क्युबा मधल्या अमेरिकन सैन्य ठाण्याच्या तुरुंगातील कैद्यांचे फोटो प्रथमच प्रसिध्द झाले होते. लोखंडी साखळ्यात हे कैदी जखडले गेले होते आणि हा तुरुंग म्हणजे कैद्यांची छळछावणी बनला होता.

या तुरुंगातील एका कैद्यासाठी वर्षाला ५.६ कोटी रुपये खर्च येतो. तुरुंगाची देखभाल करण्यासाठी पेंटागोन दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करते. बायडेन यांनी हा तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेतला तर तो अमेरिकेसाठी फायद्याचा ठरणार आहे शिवाय मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून त्यांची सुटका होणार आहे. बराक ओबामा यांनीही त्यांच्या कार्यकाळात हा तुरुंग बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.