केंद्राने महाराष्ट्राला दिला होता आठवड्याचा लॉकडाउन परिणामकारक नसल्याचा सल्ला


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सरकारने प्रचंड वेगाने होत असलेल्या कोरोनाचे प्रादुर्भाव आणि बाधितांच्या वाढत्या संख्येला पायबंद घालण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, कोरोना रोखण्यास आठवड्याच्या शेवटी दोन दिवस असणाऱ्या लॉकडाउनची फार मदत होणार नसल्याचा सल्ला महाराष्ट्राला केंद्राने दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या सचिवांना दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत याबद्दल सूचना केल्याची माहिती आता समोर आली आहे.

याविषयीची माहिती एका अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबद्दल सूचना केल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची उच्च स्तरीय बैठक झाली होती. राज्याच्या मुख्य सचिवांना या बैठकीत बोलण्यासाठी भरपूर वेळ देण्यात आला होता. त्यावेळी आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लावण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्यात १६ हजार ६२० नवीन रुग्ण १५ मार्च रोजी आढळून आले होते. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्रही पाठवले होते. ज्यात लॉकडाउन न लावता कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्याची सूचना केली होती. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन यासारखे उपाय संक्रमण रोखण्यात फार प्रभावी नाहीत. त्याऐवजी जिल्हा पातळीवरील प्रशासनाने कंटेनमेंट उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा, असे भूषण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

राज्यात कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन लागू करण्याचा निर्णयावर बद्दलही माहिती दिली. लॉकडाउन लावण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या अभ्यासानंतर घेण्यात आला. कारण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, कोरोनाबाधितांची संख्या राज्यात वेगाने वाढत असतानाही कोरोना नियमावलीचे पालन करण्यात लोक उदासीन दिसत आहेत. लोकांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेवर येणाऱ्या ताणाबद्दल अंदाज लावण्यात आला. राज्यातील भविष्यातील परिस्थितीचा अंदाज दोन मुद्द्यांवर घेण्यात आला. यात बेड्सची संख्या आणि पुरेसा ऑक्सिजनचा साठा. त्यात तज्ज्ञांनी असे सांगितले की, ही रुग्णवाढ याच वेगाने वाढत राहिली, तर १७ एप्रिलपर्यंत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येईल, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.