पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश करणार कल्याणराव काळे


पंढरपूर – भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत रंगू लागला असून, भाजपला मतदानापूर्वीच मोठा धक्का बसणार आहे. भाजप नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चत झाल्याचे वृत्त आहे. ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काळे प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत होत आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवले आहे. पण मतदानापूर्वीच भाजपला धक्का बसणार आहे. भाजप नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

८ एप्रिल रोजी कल्याणराव काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. भाजप आणि राष्ट्रवादीकडून पंढरपूर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असतानाच काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपला धक्का मानला जात आहे. कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांना ६५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणेच्या आधीपासूनच सुरू होती. तसे संकेत कल्याणराव काळे यांनीही दिले होते. एका कार्यक्रमात बोलताना आपण यापुढे शरद पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे वक्तव्य केले होते. पवार यांच्यामुळेच साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे म्हणाले होते.