१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंडियन मेडिकल असोसिएशनने यासंदर्भात पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मोदींना लिहिलेल्या या पत्रामध्ये देशभरातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणीही इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. सहा महत्वाचे मुद्दे या पत्रामध्ये असोसिएशनने मांडले असून त्यांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

असोसिएशनने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरोनाविरुद्धचा तुमच्या नेतृत्वाखाली लढा सुरु असतानाच देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगताना खेद होत आहे, असे म्हटले आहे. तसेच पुढे देशामध्ये सध्या सात लाख ४० हजार अॅक्टिव्ह कोरोनाबाधित असल्याचेही इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर चार एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित २४ तासांमध्ये आढळून आले. ही कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतरची सर्वात मोठी वाढ असल्याचेही कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करताना देशातील डॉक्टरांच्या या सर्वात मोठ्या संस्थेने म्हटले आहे.

भारत सरकारने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे साडेतीन लाख सदस्य पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीशी असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये पहिल्या फळीतील कोरोना योद्धे आणि सर्वसामान्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाधितांची ओळख पटवून त्यांना ट्रेस करुन त्यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात ज्या सुचना जारी केल्या आहेत त्याप्रमाणे काम केले जात आहे. पण लोक मोठ्या प्रमाणात मास्क न घातला एका जागी कर्दी करतात, कोरोनासंदर्भातील नियम पाळत नाहीत, कोरोना विषाणूमध्ये सतत बदल होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची मेहनत निष्फळ ठरत असून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

कोरोना नियम न पाळणाऱ्यांविरोधात सध्या कठोर कारवाई, मोठ्या प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड्स उपलब्ध करुन देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांचा उत्साह वाढवणे. त्याचप्रमाणे नियमानुसार संपूर्ण उपचार करुन घेणे या गोष्टींवर सध्याच्या काळात भर देणे गरजेचे असल्याचेही असोसिएशनने पत्रात नमूद केले आहे.

देशातील ७ कोटी ९१ लाख व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आली असून त्यापैकी ६ कोटी ८६ लाख व्यक्तींना पहिला डोस तर एक कोटी पाच लाख व्यक्तींना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सध्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. पण ज्या वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे ते पाहता आम्ही तुम्हाला विनंती करतो की लसीकरणाची गती वाढवली पाहिजे आणि १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची परवानगी देण्यात आली पाहिजे.

घरापासूनच चालत जाता येईल अशा अंतरावर सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिले पाहिजे. तसेच लसीकरणासाठी खासगी क्लिनिक आणि रुग्णालयांचीही मदत घेतली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरकडे लसीकरणाची सोय असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लसीकरणावर दिसून येईल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे. जिल्हा स्तरावर कोरोना लसीकरण टास्क फोर्स टीम तयार करुन त्यामध्ये सरकारी तसेच खासगी व्यक्तींची मदत घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यत लसीकरण पोहचवण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. यासाठी असोसिएशन आणि त्यामधील सभासद काम करण्यासाठी तयार असल्याचे असोसिएशनने पंतप्रधानांना या पत्राद्वारे कळवले आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले पाहिजे. तसेच हे प्रमाणपत्र असेल तरच राशन आणि इतर सार्वजनिक सुविधा देण्याचा नियम तयार केला पाहिजे अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या म्हणजेच चित्रपट, सांस्कृतिक आणि धार्मिक तसेच क्रीडा या क्षेत्रातील कार्यक्रमांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.