कोरोनाबाधितांच्या संख्येसह देशभरातील मृत्यूदरातही वाढ


मुंबई : राज्यात सध्या कोरोना या दुष्ट संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांच्या संख्येसह देशभरातील मृत्यूदरातही वाढ होत असल्याचे दिसत आहे. मृत्यूदरात गेल्या चार आठवड्यांमध्ये सरासरी 4.5 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्राची 30 पथके या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

देशात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत सोमवारी विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले. एक लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद देशात झाली. परंतु, देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यासोबतच मृत्यूदरातही विक्रमी वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढली, असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. अशातच आशादायी गोष्ट म्हणजे मृत्यूदर कमी होता. पण, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, देशातील मृत्यूदरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.

नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दराप्रमाणे गेल्या काही दिवसांत मृत्यूदरातही वाढ होत आहे. गेल्या चार आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. देशात 8 मार्च रोजी कोरोनामुळे 96 जणांचा मृत्यू झाला होता. 4 एप्रिलला कोरोनामुळे दगावलेल्यांचा आकडा 425 एवढा होता. याचाच अर्थ गेल्या चार आठवड्यात मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्के एवढी वाढ झाली आहे. त्याआधीच्या चार आठवड्यांत कोरोनाबाधितांची संख्या 50 टक्क्यांनी वाढत होती. पण मृत्यूदरात कोणतीही वाढ झाली नव्हती. याचाच अर्थ ज्या वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्याच वेगाने देशात मृत्यूदर वाढल्याने साऱ्यांची चिंता वाढली आहे.