शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजप प्रवेश


मुंबई: भाजपमध्ये शिवसेनाच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी प्रवेश केला आहे. तृप्ती सावंत यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. तृप्ती सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनेतून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

शिवसेनेने २०१९च्या विधानसभेच्या निवडणूकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी अपक्ष अर्ज भरत युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या तृप्ती सावंत या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. पण त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने माजी आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे निवडणूक लढवित होते. पण सहानभुतीच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला.