तृणमुल नेत्याच्या घरात सापडल्या ईव्हीएम मशिन्स


कोलकाता – आज पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदान केंद्रासमोर सकाळपासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत असतानाच उलुबेरिया येथे एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या यासंदर्भात वृत्तानुसार उलुबेरिया येथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्या आहेत. यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा टीका होतानाच चित्र दिसत आहे. पण हा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला असून मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांचा या मशीन्सशी काहीही संबंध नसल्याचे निवडणूक आयोगाने सोमवारीच स्पष्ट केले आहे. पण या प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

सेक्टर अधिकाऱ्याला या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल नेत्याच्या घरी आढळून आलेले ईव्हीएम हे रिझर्व्ह म्हणजेच अतिरिक्त ईव्हीएम होते. पण आता त्यांचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार नाही. या प्रकरणामधील सर्व दोषींविरोधात गंभीर कारवाई केली जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना निवडणूक आयोगाने, हावडा जिल्ह्यातील विधानसभा श्रेत्र १७७ उलुबेरिया उत्तरमधील सेक्टर १७ येथे निवडणूक अधिकारी असणाऱ्या तपन सरकार यांना अतिरिक्त ईव्हीएमसहीत पाठवले होते. पण आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊन हा अधिकारी झोपी गेल्याने हा गोंधळ झाला. असे करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळेच या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर कठोर नियमांअंतर्गत कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.