महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि पंजाबमध्ये केंद्राच्या 50 हाय लेव्हल हेल्थ टीम दाखल


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. एक लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर रविवारी एकाच दिवशी पडली होती. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोनाचा कहर जास्त असल्याचे दिसून येत आहे. आता केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून या तीन राज्यांत सोमवारी 50 हाय लेव्हल हेल्थ टीम पाठवण्यात आल्या आहेत.

दोन सदस्य या प्रत्येक टीममध्ये असतील. त्यामध्ये एक इपिडर्मिटोलॉजिस्ट आणि एक आरोग्य तज्ज्ञाचा समावेश असेल. महाराष्ट्रातील 30 जिल्हे, छत्तीसगडमधील 11 जिल्हे आणि पंजाबमधील 9 जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी या टीम समन्वय साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोरोनाकाळात घ्यावयाच्या खबरदारी, उपलब्ध सुविधा, टेस्टिंग आणि इतर गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करणार आहेत.

देशातील सोमवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता महाराष्ट्रात 47,288, छत्तीसगडमध्ये 7,302 आणि पंजाबमध्ये 2,692 कोरोनाबाधित सापडले होते. देशातील एकूण नवीन रुग्णसंख्येपैकी अर्ध्या रुग्णसंख्येची भर ही एकट्या महाराष्ट्रातून पडत आहे.

देशातील कोरोनाचा उद्रेक पाहता 8 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. रविवारी बोलताना पंतप्रधानांनी 5 फोल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेन्ट, गाईडलाइन्स नुसार वर्तन आणि लसीकरण या गोष्टींचे गंभीरपणे पालन केल्यास कोरोनाचे संकट नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता.