आनंद महिंद्रांचा उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा


मुंबई – कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून लसीकरणासंबंधी एक महत्वाची मागणी केली आहे. २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे दिसत असून, या वयोगटाला देखील आता विषाणूपासून वाचविणे आवश्यक असल्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. उद्धव ठाकरेंनी या अगोदर ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जावी अशी मागणी केली होती, ती पंतप्रधान मोदींनी मान्य केली होती. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे पत्रात आभार व्यक्त केले असून, लसीकरणाचा वयोगट आणखी कमी करावा, अशी विनंती केली आहे. याशिवाय लसींचा पुरवठा देखील वाढण्याची मागणी केली आहे. तरूण वर्ग मोठ्यासंख्येने कामासाठी घराबाहेर पडत असतो, जर त्यांचे लसीकरण झाले तर रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


दरम्यान आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. लॉकडाउन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहते. आता या कोरोनासंदर्भाती नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधने लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.