हिमाचल मधील शिसूला भेट दिलीत?

उन्हाळा सुरु झाला की थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम टाकावा अशी अनेकांची इच्छा असते. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर हिमाचल ही अनेकांची पहिली पसंती आहे. कुलू, मनाली, केलोंग, सिमला या लोकप्रिय पर्यटन स्थळी आता गर्दी होऊ लागली आहे. पण चार दिवस शांतपणे, निर्सगाच्या सानिध्यात राहण्याची इच्छा आहे आणि हिमाचल मध्ये जायचे आहे असा निर्णय तुम्ही घेतला असेल तर शिसू या छोट्याश्या गावाचा विचार नक्की करू शकता.

हिमाचलच्या लाहौल स्पिती मधील हे छोटेसे गाव अतिशय रमणीय आहे. मनाली पासून केवळ ४० किमी वर असलेल्या या गावात बौध्द वस्ती जास्त आहे. पण स्वर्ग कसा असतो हे जाणून घ्यायचे असेल तर शिसूला भेट द्यायलाच हवी. राहण्यासाठी स्वस्त सुंदर हॉटेल्स, गेस्ट हाउसेस आहेत तसेच होम स्टेची सुविधा ही चांगली आहे. विविध प्रकारचे खास खाद्य पदार्थ येथे आवर्जून चाखायला हवेत.

येथील नितांतसुंदर, शांत निसर्ग हे मुख्य आकर्षण आहेच पण शिसू धबधबा अतिशय आकर्षक असून येथे पर्यटक खिळून राहतात. लेह मनाली राजमार्गावर हे ठिकाण आहे. शिसू लेक हे असेच दुसरे सुंदर ठिकाण. चारी बाजूनी उंच बर्फाच्छादित पहाडांच्या मध्ये हे सरोवर आहे. हिवाळ्यात येथे प्रचंड बर्फ पडते. बाकी जगापासून दूर, शांत अश्या या जागी मन शांत होते. बाकी निसर्ग पाहण्यासाठी मुद्दाम बाहेर पडायची गरज नाही. कारण तुमच्या राहत्या ठिकाणावरून सुद्धा उंच डोंगर, दऱ्या, हिरवळ, उंच उंच वृक्ष सहज नजरेस पडतात. त्यामुळे फारशी दगदग नाही. पुरेशी विश्रांती आणि निसर्गसौंदर्याचा पोटभर आस्वाद अश्या अनेक गोष्टी या गावाच्या भेटीने साध्य करता येतात.