विकी कौशलला करोना, मिलिंद सोमणने शेअर केली खास काढा रेसिपी

बॉलीवूड मध्ये करोना संसर्ग वेगाने पसरत चालला असून गेल्या आठवड्यात १७ सेलेब्रिटी करोना पोझिटिव्ह आले आहेत. आलीया भट्ट आणि अक्षय कुमार यांच्या पाठोपाठ विकी कौशल यालाही करोना झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी करोनाची शिकार झालेल्या मिलिंद सोमण याच्या चाहत्यांसाठी मात्र चांगली बातमी आहे. मिलिंदने करोनाला हरविले आहे. सोशल मीडियावर या संदर्भात माहिती देताना मिलिंदने त्याने या काळात घेतलेल्या एका स्पेशल काढ्याची माहिती दिली आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर पत्नी अंकिता सह फोटो शेअर केले आहेत. त्यात मिलिंद लिहितो,’ तुमची इच्छा आणि सकारात्मकता यामुळे करोनातून बाहेर आलो आहे. कोणत्याही आजारात औषधांबरोबर सकारात्मकता आवश्यक आहे. या काळात मी धने, मेथ्या, मिरी, तुळस, आले व गुळाचा काढा घेतला. डॉक्टरांनी सांगितलेले सर्व ऐकले. पाच दिवस रक्त पातळ ठेवणारी औषधे घेतली पण बाकी कुठलेही औषध घेतले नाही.’

मिलिंद सांगतो, त्याला करोना संसर्ग कसा झाला हे कळलेच नाही. कोणतीही लक्षणे नव्हती. १८ मार्च ला दिल्ली हून आला तेव्हा त्याची करोना टेस्ट निगेटिव्ह होती. त्यानंतर तो घरातच होता. फक्त पळण्यासाठी बाहेर जात होता. आठवडाभर त्याला वास कमी येत होता आणि २३ मार्च रोजी डोकेदुखी झाली होती. बॉलीवूड मध्ये रणबीर, कार्तिक आयर्न, मनोज वाजपेयी, आर माधवन, परेश रावळ, आमीर खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट, गोविंदा याना करोनाने गाठले आहे.