प्राचीन काळापासून वापरले जात आहेत मास्क

गेल्या वर्षी करोनाचा उद्रेक झाल्यापासून मास्कचा वापर हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. लसीकरण मोहीम जोरात सुरु असली तरीही मास्कला पर्याय राहणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र मास्कचा वापर हा आत्ताचा शोध नाही तर प्राचीन काळापासून विविध कारणांनी मास्क वापरले जात आहेत.

मार्को पोलो या प्रवाश्याने १३ व्या शतकात चीन मध्ये नोकरांना विणलेल्या स्कार्फने चेहरा झाकावा लागत होता असे लिहून ठेवले आहे. यामध्ये चीनी सम्राट जेवत असताना त्याच्या जेवणाचा स्वाद नोकरांच्या श्वासामुळे बिघडू नये हे कारण होते. १४ व्या शतकात आलेल्या ब्लॅक डेथ प्लेगने युरोप मध्ये थैमान घातले होते. या रोगाने १३४७ ते १३५१ या काळात २ कोटी ५० लाख जीव घेतले होते. या साथीच्या रोगाची चिकित्सक डॉक्टर्सना सुद्धा दहशत बसली होती. त्यावेळी मेडिकल मास्कचा वापर केला जात होता.

१६६५ मध्ये ग्रेट प्लेगचा उद्रेक झाला होता. त्यावेळी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर चामडी मास्क, डोळ्यावर काचेचा चष्मा, हातात ग्लोव्ज, आणि डोक्यावर टोपी घालत असत. डॉक्टर जे मास्क वापरत असत त्यात सुगंधी वनौषधी भरल्या जात असत. हे मास्क बराच काळ वापरात होते. १९ व्या शतकात लंडन मध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण जास्त होते. बाहेरच्या वातावरणाचा प्रभाव नको म्हणून त्या त्वचा झाकण्यास पसंती देत असत. त्याकाळी या महिला दागिन्यांवर जाळीदार कपडे घालत. त्यामुळे पाऊस, धूळ आणि प्रखर सूर्यप्रकाशापासून त्यांना संरक्षण मिळत असे.