अनिल देशमुखांच्या प्रकरणी राज ठाकरेंचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार?


मुंबई : अनिल देशमुख मुंबई उच्च न्यायालयाच्या सीबीआय तपासाच्या निकालानंतर गृहमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर या प्रकरणात राजीनाम्यासाठी दबाव होता. पण देशमुखांवर झालेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचा असा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे आदेश दिल्यानंतर देशमुखांनी राजीनामा दिला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याची या राजीनाम्यानंतर चर्चा होत आहे, त्यांनी ज्यात केंद्र सरकारकडून चौकशीची मागणी केली होती. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरेंनी केले होते.

मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट अनिल देशमुख यांनी दिले होते, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपनंतर राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन तपास करावा, केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे निलंबित होते. पोलीस सेवेत त्यांना पुन्हा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह होता. शिवाय शिवसेनेतही वाझे होते. दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी घनिष्ट मित्र आहेत. याच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. ही स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांनी ठेवली,असा आरोपही होतो. मुळात अशी घटना कोण्यातरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली म्हणूनच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी. कारण याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही आणि जशी चौकशी योग्य प्रकारे झाल्यास फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावे बाहेर येतील, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल, असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते.