व्लादिमीर पुतीन यांनी मिळवला रशियातील ‘सर्वात देखणा पुरुषा’चा मान


मॉस्को – रशियातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जाहीर करण्यात आल्यामुळे पुतीन यांना रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख मिळाली आहे. ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये सर्वात सुंदर पुरुष ठरले.

रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईटने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचे पहायला मिळाले. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. पुतीन हेच रशियन जनतेच्या मनात आजही देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचे चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचे वेबसाईटने सर्वेक्षणात म्हटले आहे.

मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडू या सर्वेक्षणामध्ये फिके पडल्याचे पहायला मिळाले. वेळोवेळी मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. पुतीन यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असे काही वाटत नसल्याचे म्हटले होते. पुतीन यांना या फोटोंमध्ये एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

हे सर्वेक्षण २२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचे मत दिले होते. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नसल्याचे मत दिले होते.

पुतीन यांच्यानंतर रशियातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत अभिनेता दिमित्री नागियेव यांचा समावेश आहे. त्यानंतर डॅनिला कोजलोव्स्की आणि कॉन्साटंटिन खाबेन्सिकी यांचा क्रमांक असून या सर्वांमध्ये दोन ते तीन टक्के मतांचा फरक दिसून येतो. रशियामधील ३०० शहरांमधून हजार पुरुष आणि दोन हजार महिलांनी या सर्वेक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवला. पुतीन यांनाच या सर्वेक्षणामध्ये १० टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याचा दावा वेबसाईटने केला आहे.

नुकताच रशियन संसदेमधील वरिष्ठ सभागृहाने पुतीन यांना आणखी दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होण्यासंदर्भात संधी देण्याचा कायदा संमत केल्यामुळे पुतीन हेच २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. या सर्वेक्षणामधून पुन्हा एकदा पुतीन यांची लोकप्रियता सर्व सामान्यांमध्ये आजही कायम असल्याचे दिसून आले आहे.