जवानांनी दिलेले बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल : अमित शहा


जगदलपूर : शनिवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या जवानांची संख्या आता २२ वर पोहोचली असून, या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणची अमित शहा यांनी पाहणी केली. तसेच शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, आणखी ताकदीने लढू आणि या लढाईत आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास यावेळी बोलताना अमित शहा यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, जवानांचे सर्वोच्च बलिदान वाया जाऊ देणार नाही. ताकदीने लढू आणि जिंकून दाखवू. छत्तीसगडच्या जनतेला आणि देशवासियांना आश्वस्त करतो की, नक्षलवादाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यात येईल. पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने या नक्षलवादी हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या संरक्षण दलातील जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो.

या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात लढाई करताना दिलेले बलिदान देश कायमच लक्षात ठेवेल. नक्षलवादाविरोधात जवानांनी दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील, असे सांगत गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहोचली असून, नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झाली असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली असून, हा लढा सुरू ठेवला पाहिजे, असे अधिकाऱ्यांना जोर देऊन म्हटले आहे. यावरून आपल्या जवानांचे मनोधैर्य किती उंचावलेले आहे, ही बाब दिसून येते, असे शहा यांनी नमूद केले.