पुणेकर पुन्हा एकदा चर्चेत; कोरोना लस घ्या अन् चितळेंची बाकरवडी घरी न्या


पुणे : मुंबईसह पुण्यातही कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण याच दरम्यान शहरातील लसीकरणाची मोहीम विविध केंद्रावर जोरदारपणे सुरू आहे. पण,लसीकरणाच्या मोहिमेला नागरिकांचा आणखी प्रतिसाद मिळावा तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे. लस घ्या अन् बाकरवडी घरी घेऊन जा.. या संकल्पनेतून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले जावे हा उद्देश या उपक्रमामागे आहे.


पुण्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहनपर खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे. इंद्रनील चितळे यांनी पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सच्या माध्यमातून याबाबतचे ट्विट केले आहे. आठवडाभरात या माध्यमातून मिळून साधारण १५ हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत. पण यासाठी कोणतेही लसीकरण केंद्र ठरवण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला १ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचाच हा एक भाग मानला जात आहे.

कोणत्याही एका केंद्रावर आम्ही बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर स्वयंसेवकांमार्फत वेगवेगळ्या केंद्रांवर पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये,हा यामागचा उद्देश असल्याचे याबाबत माहिती देताना चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे म्हणाले.