देशात काल एकाच दिवसात एक लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून देशात काल दिवसभरात एक लाखांहून जास्त नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 478 जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी गेल्या वर्षी 16 सप्टेंबर 2020 ला देशातील सर्वात जास्त म्हणजे 97,894 रुग्णांची भर पडली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 एवढी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 एवढी झाली आहे.

रविवारी 52,847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असून आतापर्यंत सात कोटी 91 लाख 5 हजार 163 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.