मुंबईतच होणार आयपीएल सामने- सौरव गांगुली

करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अंशिक लॉकडाऊन लावला गेला असल्याने आयपीएलचे सामने मुंबईत होणार का यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खुलासा केला असून हे सामने मुंबईतच होतील असे स्पष्ट केले आहे. वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे १० सामने खेळले जाणार आहेत. मात्र या स्टेडियम वरील १० कर्मचारी आणि स्पर्धेशी संबंधित ६ प्रबंधक कोविड १९ पोझिटिव्ह आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी कप्तान आणि हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी हैद्राबाद मध्ये हे सामने खेळविता येतील आणि त्यासाठी सर्व सुविधा दिल्या जातील असा प्रस्ताव रविवारी बीसीसीआय समोर मांडला होता.

मुंबईमध्ये करोना नियंत्रणाबाहेर गेला तर स्टँड बाय म्हणून इंदोर आणि हैद्राबादचा पर्याय बीसीसीआयने ठेवला आहे. मुंबईत होणारे सामने १० ते २५ एप्रिल दरम्यान होणार आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अंशिक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र सरकारने आयपीएल सामने खेळविण्यासाठी परवानगी दिली असल्याचे गांगुली यांचे म्हणणे आहे. मुंबईत रविवारी ११ हजार नव्या करोना केसेस नोंदल्या गेल्या आहेत.

मुळात आयपीएल सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नाही. खेळाडू बायो बबल मध्ये आहेत. मुंबईत सध्या दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडीयन्स, राजस्थान रॉयल आणि पंजाब किंग्स अश्या चार टीम सराव करत आहेत. मात्र त्यातील कुणीही वानखेडे स्टेडियमवर गेलेले नाहीत असा  खुलासा केला गेला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल संबंधित सर्व खेळाडूंचे करोना लसीकरण करून घेण्याचा विचार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. आयपीएलचा पाहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नई मध्ये होत आहे.