ओप्पोच्या भारतीय प्रकल्पात तीन सेकंदात बनतो एक स्मार्टफोन

चीनी कंपनी ओप्पो स्मार्टफोनला भारतीय बाजारात वाढती मागणी असून गेल्या तीन दिवसात या कंपनीने भारतात २३०० कोटींचा व्यावसाय केला आहे. ओप्पोने त्यांची एफ १९ प्रो सिरीज भारतीय बाजारात उतरविली असून त्यांच्या नॉयडा येथील उत्पादन प्रकल्पात तीन सेकंदाला एक स्मार्टफोन तयार होत आहे.

ओप्पो इंडियाचे अध्यक्ष एल्विस झोउ या संदर्भात माहिती देताना म्हणाले नॉयडा मध्ये कंपनीने ११० एकर जागेत उत्पादन प्रकल्प उभारला आहे. सप्लाय चेन अखंड राहावी यासाठी १२ लाख फोनला लागेल इतके सामान स्टॉक मध्ये ठेवले जात असून येथे ३ सेकंदात एक स्मार्टफोन तयार होतो आहे. या प्रकल्पात १० हजार कर्मचारी काम करत आहेत. महिन्याला आम्ही ६० लाख स्मार्टफोन तयार करत आहोत आणि वर्षाला ५ कोटी स्मार्टफोन तयार केले जात आहेत.

कंपनीने एफ १९-२ प्रो, प्रो प्लस फाईव्ह जी, मिड रेंज फोन भारतीय बाजारात नुकतेच सादर केले असून त्याला ग्राहकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे असेही त्यांनी सांगितले. भारतीय बाजारात वाढती मागणी असल्याने उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.