६० लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा लिक, ऑनलाईनवर मोफत उपलब्ध

भारतातील सुमारे ६० लाख फेसबुक युजर्सची खासगी माहिती व फोन नंबर लिक झाले असून ऑनलाईनवर त्याचे मोफत वाटप केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. जगभरातील १०० पेक्षा जास्त देशातील ५३.३० कोटी फेसबुक युजर्सची खासगी माहिती यात लिक झाली असून फेसबुकच्या इतिहासात हा सर्वात मोठा डेटा लिकचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हा सारा डेटा ऑनलाईनवर मोफत उपलब्ध केला गेला आहे.

इतक्या मोठ्या पातळीवर डेटा लिक मध्ये मोठ्या संखेने हॅकर्स सामील असतील व ते हा डेटा स्टोअर करून वेळोवेळी त्याचा उपयोग करू शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. आयटी कायदा तज्ञांच्या म्हणण्यानुसार लिक झालेल्या डेटा मध्ये जन्मतारीख, नाव, पत्ता, इमेल आणि काही केस मध्ये फोन नंबर सुद्धा आहेत. २०१९ मधल्या फेसबुकच्या एका कमजोर तंत्रज्ञानामुळे हे झाले असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे हा डेटा दीड ते दोन वर्षे जुना असू शकतो.

पण तरीही हा डेटा हॅकर्स साठी महत्वाचा आहे कारण सर्वसाधारण युजर्स फोन नंबर किंवा इमेल वारंवार बदलत नाहीत आणि बरेचदा जन्मतारीख किंवा फोननंबर अकौंटचा पासवर्ड म्हणून वापरले जातात. हॅकर्स साठी या डेटाची किंमत १०६० कोटी आहे. फेसबुक आयडीचा या प्रकारचा एक डेटा हॅकर्स साधारण २० डॉलर्सला विकतात. त्या हिशोबाने ५३.३० कोटी युजर्सच्या डेटाची किंमत १०६० कोटी रुपये होते.