झूम मिटींगमध्ये अचानक विवस्त्रावस्थेत कॅमेऱ्यासमोर आली आफ्रिकन नेत्याची पत्नी

करोना मुळे बहुतेक सर्व ठिकाणी ऑनलाईन कामे करण्याची वेळ आली आहे आणि महत्वाच्या अनेक बैठकाही ऑनलाईन घेतल्या जात आहेत. मात्र झूमवर चाललेल्या अशाच एका मिटींगमध्ये एका आफ्रिकन नेत्याला आणि त्याच्या पत्नीला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची पाळी आली.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास आफ्रिकेतील नॅशनल हाउस ऑफ ट्रॅडीशनल लीडर्स या संस्थेच्या २३ नेत्यांची बैठक झूमवरून सुरु होती. केपटाऊन मधील करोना संक्रमण वाढ आणि मृत्यू यावर चर्चा सुरु होती. त्यावेळी झोलेला देऊ नावाचे नेते केपटाऊन मधील करोना परिस्थिती आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केले जात असलेले काम याविषयी माहिती देत होते. त्यावेळी अचानक त्यांची पत्नी विवस्त्रावस्थेत रूम मध्ये आली तेव्हा ते दृश्य कॅमेऱ्यावर पाहून मिटींग मधील बाकीचे सदस्य अचंबित झाले. दुसऱ्या एका नेत्याने झोलेला यांना तुमची पत्नी स्क्रीनवर कोणत्या स्थितीत दिसतेय याची जाणीव त्यांना करून दिली. अन्य एकाने तुम्ही मिटींग मध्ये आहात याची जाणीव या महिलेला नाही काय अशी विचारणा केली. तेव्हा झोलेला यांनी झाल्या प्रकारची माफी मागितली आणि कॅमेरा पॉझ केला.

या संदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिध्द केले. त्यात ते म्हणतात, झूम आमच्यासाठी नवीन आहे. त्याचे प्रशिक्षण मिळालेले नाही. घरातही हा प्रकार सर्वांसाठी नवा आहे. मी बोलत असताना माझे सारे लक्ष कॅमेऱ्यावर होते. त्यामुळे पत्नी खोलीत आल्याचे मला समजले नाही. आपली बैठक १० वाजता संपणार होती मात्र ती उशिरापर्यंत सुरु राहिली. माझी पत्नी बाथ घेऊन बाहेर आली तेव्हा तिलाही कॅमेरा सुरु आहे हे माहिती नव्हते. झाल्या प्रकाराबद्दल झोलेला यांनी माफी मागितली आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिली.