इजिप्त मध्ये ३ हजार वर्षे प्राचीन शाही घराण्याच्या ममींची परेड  

शनिवारी इजिप्तमध्ये एका अनोख्या परेड किंवा वरातीचा सोहळा पार पडला. तीन हजार वर्षे जुन्या १८ राजे आणि ४ राण्या यांच्या ममींची भव्य वरात काढली गेली. या ममी नवीन राष्ट्रीय संग्रहालयात स्थानांतरीत करण्यात आल्या. या सर्व शाही ममी वातानुकुलीत पेट्यांमध्ये होत्या आणि ट्रकवरून त्यांची वरात काढली गेली. देर- अल- बहारी येथील व्हॅली ऑफ किंग्स मध्ये या ममी दफन केल्या गेल्या होत्या. किंग राम्सेस-२, किंग सेकनेअर ताओ, किंग तुतमेन -३, किंग सेती १ या फेरोचा त्यात समावेश होता.

यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली गेली होती आणि ममीना २१ बंदुकांची सलामी दिली गेली. संपूर्ण मार्गावर रेंगीबेरंगी लेझर प्रकाश होता आणि राजशाही धून वाजविली जात होती. ममी असलेल्या पेट्यांवर संबंधित राजा किंवा राणीचे नाव आकर्षक पद्धतीने लिहिले गेले होते. देशातील बडे नेते या वराती मागून वाहनातून जात होते तर इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल सिद्दी यांनी नवीन संग्रहालयात या ममींचे स्वागत केले. या वेळी ते म्हणाले, हा आमचा इतिहास आहे आणि आमची संस्कृती त्यातून दिसते. या बहुतेक ममी प्राचीन न्यू किंग्डम मधल्या आहेत. या राजांनी १५३९ इसवी सन पूर्व ते १०७५ ई.स. पूर्व शासन केले होते.