विठ्ठल मंदिर प्रशासनाचा यु टर्न; रद्द केला भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय


पंढरपूर : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामळे विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय बारगळला असून हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने तो निर्णय प्रशासनाने रद्द केला आहे. अशी चाचणी देशातील कोणत्याही मंदिरात घेतली जात नसल्याने प्रशासनाने आता या भूमिकेपासून यु टर्न घेतला आहे. यातच मग विठ्ठल मंदिरात कोरोना चाचणी सुरू केली तर सर्वच धर्मियांच्या प्रार्थनास्थळात अशी चाचणी का नको? अशी भूमिका पुढे आल्याने प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.

विठ्ठल मंदिर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांची रॅपिड टेस्ट करूनच मंदिरात सोडण्याबाबत निर्णय घेतला होता. यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाकडून चाचण्या केल्या जाणार होत्या. यासाठी दर्शन मंडपातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करून भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार होते. या तपासण्या उद्यापासून सुरू करण्याची प्रशासनाची तयारी असतानाच याबाबत वाद सुरू झाल्याने हा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे.