पंढरपूर : कोरोना उपाययोजनांसाठी गेल्या वर्षी राज्याचे संपूर्ण बजेट खर्च केले त्याचा हिशोब जनता मागत असून विकासकामांना कात्री लावून केलेला हा खर्च तुमच्या भ्रष्टाचारासाठी केलेला नसल्याचा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे राजू शेट्टी आले होते. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे महाविकास आघाडी सरकार उभे राहते – राजू शेट्टी
आघाडी सरकारकडून वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे शासनाला अशक्य नव्हते. पण हे सरकार शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचा घणाघात शेट्टी यांनी केला.
राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकावणाऱ्या उमेदवाराला आघाडीचा उमेदवार करताना आम्हाला विचारले होते का? असा सवाल करत आम्ही निवडणूक या विरोधात लढवण्याचा निर्णय घेतला आणि सचिन पाटील यांना उमेदवारी दिल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या निवडणुकीत स्वाभिमानी मतदारसंघ वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.