महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या


मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोटच झाल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. पण याच कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. तसे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पण आता पुन्हा लॉकडाउन करण्याला विरोध होताना दिसत आहे. या लॉकडाऊनला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही विरोध दर्शवला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महिंद्रा यांनी घेतलेल्या भूमिकेवर मत मांडले असून, पंतप्रधान मोदी यांच्या जनता कर्फ्यू मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या बडवल्याचा आनंदही साजरा केला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आहे. राऊतांनी यावेळी राज्यातील स्थिती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर टीकास्त्र डागले, त्याचबरोबर आनंद महिंद्रांच्या विरोधावरही भाष्य केले आहे. महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. जेथे कोरोनाचे भय अजिबात नाही अशा पश्चिन बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉकडाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोनाचा संपूर्ण खातमा झाला असे घडले नसल्याचे राऊत म्हणाले.

कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळ्या व टाळ्या पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नसल्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी अचानक संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. ‘हिंदुस्थान को बचाने के लिए, हिंदुस्थान के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात १२ बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!’ ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला.

हिंदुस्थानने याच काळात स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात मोठे पलायन पाहिले. देशभरात लोक अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच कोंडून घेतले. कमाईचे साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीने त्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवले. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली. तुम्ही मला २१ दिवस द्या. २१ दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही कोरोनाची लढाई व लॉकडाऊनची भीती कायम असल्याची टीका राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे.