आकर्षक इमारतीचा शापिंग मॉल ऐवजी तुरूंगासाठी वापर


व्हेनेझएलात सॅन अगस्टीन येथे असलेली, वेगळ्या पण आकर्षक डिझाईनची इमारत जगातील पहिला शॉपिंग मॉल म्हणून बांधली गेली मात्र येथे शॉपिंग मॉल कधी झालाच नाही तर परिस्थितीने असे वळण घेतले की तिचा वापर कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी केला जात आहे. या दुर्देवी इमारतीचे नांव आहे एल होलिकोड. १९५० साली ही इमारत बांधायला सुरवात झाली. तिचे डिझाईन केले होते पेट्रो न्यूबर्गर, डर्क बॉनहोर्स्ट व जॉर्ज रिमेटो या तीन वास्तूविशारदांनी. छोट्याशा पहाडावर गोल गोल रस्ते त्यासाठी काढले गेले. हेतू हा की येथील प्रत्येक दुकानासमोर ग्राहकाला स्वतःच्या कारमधून जाता यावे. व्हेनेझुएलाचे तेव्हाचे राष्ट्रपती व हुकुमशहा मार्कोस पेरेज जिमेनेज यांच्यासाठी ही आलिशान इमारत बांधली जात होती.


या इमारतीत पंचतारांकीत हॉटेल, ७ स्क्रीन असलेले थिएटर, प्रदर्शन हॉल, स्विमिंग पूल व गोल गोल रस्त्यांच्या कडेने अनेक दुकाने बांधली जात होती. मात्र ही इमारत पूर्ण होण्याअगोदर मार्कोस यांची सत्ता गेली व इमारतीचे काम ठप्प झाले.१९६१ मध्ये नवीन सरकार आले पण जुन्या हुकुमशहाशी संबंधित असल्याने या इमारतीकडे त्यांनी लक्ष दिले नाही. १९७५ साली इमारतीसाठी पैसा घातलेले दिवाळखोर ठरले व मग त्यावर सरकारने कब्जा केला. अर्थात तरीही वापर नव्हता त्यामुळे तेथे ड्रग माफियांचे साम्राज्य आले.

नंतर मात्र १९८४ साली ही इमारत पोलिसांनी ताब्यात घेतली व तेथे कैदी ठेवायला सुरवात केली.या इमारतीचे आतून फोटो काढण्याची परवानगी दिली जात नाही. २०१४ ते १६ या काळात येथून अति मारहाणीने अत्यवस्थ बनलेले किमान १४५ कैदी बाहेर काढले गेल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment