ही दिग्गज कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘रिचार्ज’ होण्यासाठी देणार एक आठवड्याची पगारी रजा


नवी दिल्ली – आपल्या जगभरातील 15,900 कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी सुट्टी देण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोफेशनल नेटवर्क कंपनी लिंक्डइनने घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ही सुट्टी पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. या काळात आपल्या कर्मचाऱ्यांनी सर्व ताण तणापासून मुक्त होऊन पुन्हा काम करण्यास रिचार्ज व्हावे, असा उद्देश ही रजा देण्यामागे असल्याचा कंपनीने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना लिंक्डइनच्या अधिकारी तेइला हॅन्सन या म्हणाल्या की, आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी मौल्यवान गोष्ट कंपनीला द्यायची होती आणि सध्याच्या काळात वेळ ही गोष्टच सर्वात मौल्यवान असल्याचे कंपनीच्या प्रशासनाला वाटते. त्यामुळे येत्या काळात कंपनीची प्रगती करायची असेल तर कर्मचारी आनंदी राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना सातत्याने केलेल्या कामामुळे अतिरिक्त ताण येत असून त्यापासून वाचण्यासाठी आणि काही काळ निवांत व्यतित करण्यासाठी कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. आता कंपनीचे सर्वच कर्मचारी रजेवर असल्याने कोणालाही कामासंबधी मेल, मीटिंगचे फोन्स किंवा इतर काही गोष्टींचा या काळात काही त्रास होणार नाही.

ही रजा कंपनीच्या 15,900 कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, पण या काळात लिंक्डइनच्या कोअर टीमचे सदस्य काम करत राहणार आहेत. हे सदस्यनंतर आपल्या वेळेप्रमाणे रजा घेणार आहेत. कोरोनामुळे कंपनीचे कर्मचारी गेले वर्षभर वर्क फ्रॉम होम करत आहेत.