किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना नेत्याने ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा


मुंबई – १०० कोंटीचा मानहानीचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर ठोकण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी धाव घेतली आहे. आपल्या प्रतिमेला किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे धक्का बसल्याचा आरोप करत वायकर दांपत्याने १०० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना किरीट सोमय्या यांना कोणत्याही प्रकारे प्रतिमा खराब करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त Live Law ने दिले आहे.

सोशल मीडिया तसेच अनेक वृत्तवाहिन्यांवर वायकर दांपत्यावर किरीट सोमय्या यांनी जाहीरपणे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाकडे रवींद्र वायकर यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची खोटी माहिती दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. वायकर दांपत्याने याच पार्श्वभूमीवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

तसेच किरीट सोमय्या यांनी केलेली वक्तव्यं बेजबाबदार आणि खोटी असून राजकीय फायदा मिळवण्यासाठी केली असल्याचे वायकर दांपत्याने म्हटले आहे. वायकर यांच्या म्हणण्यानुसार, किरीट सोमय्यांकडून या गोष्टी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रचण्यात आल्या आहेत. आपल्या पक्षातील महत्व कमी होत असल्यानेच ते वाढवण्यासाठी किरीट सोमय्या आधारहीन आरोप करत महाराष्ट्राच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे टार्गेट करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट केले आहे. “संजय राऊत यांची “शेवटची चेतावणी”…प्रताप सरनाईक ची 100 कोटीची नोटीस…रविंद्र वायकरचा 100 कोटीचा दावा…वाह रे ठाकरे सरकार,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.