काल दिवसभरात देशात सापडले 89 हजारांहून जास्त कोरोनाबाधित


नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रोज कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा नवीन विक्रम करताना दिसत आहे. देशात शुक्रवारी गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या संख्येची म्हणजे 89 हजारांहून जास्त नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात देशात 89,129 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 714 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 44,202 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 92,605 कोरोनाचे रुग्ण सापडले होते.

कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून राज्यात शुक्रवारी तब्बल 47 हजार 827 कोरोनाबाधितांची वाढ झाली. दरम्यान, परिस्थिती आणखी बिघडली तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात शुक्रवारी 24 हजार 126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 24,57,494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 3,89,832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे. दरम्यान कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, दादरा नगर हवेली, लद्दाख, लक्षद्वीप, मिजोरम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा या ठिकाणी कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही.