त्या चिमुकल्याच्या निरागसपणाचा शाळेने केला सन्मान

mizoram
सोशल मीडियावर आपल्या निरागसपणामुळे एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन झालेल्या मिझोरममधील त्या चिमुकल्याच्या कृतीची दखल त्याच्या शाळेने देखील घेतली आहे. डेरेक सी लालचनहीम असे सायकलच्या चाकाखाली आलेल्या कोंबडीच्या पिल्लाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या या मुलाचे नाव आहे. ८१ हजारहून अधिक जणांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या या पोस्टमधील डेरेकचे हावभाव खरोखरच भाव खाऊन गेले.

देशभरातून डेरेकच्या निरागस वृत्तीचे कौतुक होत असतानाच त्याचा त्याच्या शाळेनेही सत्कार केला आहे. शाळेने डेरेकचे फुले आणि विशेष प्रमाणपत्र देऊन कौतुक केले आहे. ही पोस्ट शेअर करणारे डेरेकबद्दल बोलताना म्हणतात, डेरेकला ते कोंबडीचे पिल्लू मेल्याचे समजत नव्हते. त्या पिल्लाला रुग्णालयात घेऊन जाण्याचा हट्ट त्याने आपल्या पालकांकडे केला. पण त्याला पालकांनी नकार दिल्यानंतर डेरेक स्वत:च हातात दहा रुपयाची नोट घेऊन त्या पिल्लाचा इलाज करण्यासाठी रुग्णालयात पोहचला होता.

रुग्णालयातील नर्सने आपल्या मोबाइलमध्ये छोट्या डेरेकचा हा अवतार आणि गोंधळलेली मुद्रा टिपली आणि हाच फोटो नंतर व्हायरल झाला. सांगाने केलेल्या पोस्टमधील माहितीनुसार साईरंग भागातील लहान मुलगा सायकल चालवत असताना शेजारच्यांनी पाळेल्या कोंबडीचे एक पिल्लू त्याच्या सायकलच्या चाकाखाली आले. या प्रकाराननंतर हा मुलगा त्या कोंबडीच्या पिल्लाला हातात घेऊन धावतच जवळच्या रुग्णालयात गेला. तो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपल्याकडील सर्व पैसे देत या पिल्लाला ठिक करा, असे सांगू लागला.

Leave a Comment