विदारक: कोरोना मृतदेहांचा लागला ढीग; मिळेना अंतिम संस्कारासाठी जागा


छत्तीसगढ – देशातील काही ठिकाणची परिस्थिती कोरोनामुळे बिकट होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच काही ठिकाणी यामुळे दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातही परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका दुर्ग जिल्ह्याला बसला असून, मृतदेहांचा ढीग स्मशानभूमीबाहेर लागला आहे. जिल्ह्यात अवघ्या सात दिवसात ३८ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

कोरोनामुळे छत्तीसगढमधील दुर्ग जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला असून, गेल्या काही दिवसांपासून मृत्यूची संख्याही वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या अचानक वाढल्यामुळे स्मशानभूमी आणि दफनभूमीत सध्या जागा उपलब्ध होत नाही. आधी दोन ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. मागील दोन दिवसात मृतांची संख्या वाढली. अनेक मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले आहेत. त्यामुळे २-३ ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दुर्ग जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीमध्ये लॉकडाउन लागू केला जाणार आहे. दुसरीकडे नातेवाईकांकडे मृतदेह सोपवण्यास ५०० बेडची व्यवस्था असलेल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असमर्थ ठरत असून, सध्या जिल्हा रुग्णालयात असलेल्या शवागारातील ८ फ्रीजमध्ये २७ मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत. यांसदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.