कमाईत ब्रिटनच्या महिलेने पिचाई, मस्क यांना टाकले मागे

सर्वाधिक पगार कुठल्या कंपनीच्या सीईओला मिळतो याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आपल्या भारतीय वंशाचे, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना सीईओ म्हणून सर्वाधिक पगार मिळतो हे आपण वाचले आहे. पण २०२० मध्ये ब्रिटन मधील महिला डेनिस कोट्स हिने या बाबतीत पिचाई यांनाच नाही तर टेस्लाचे सीईओ अलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांना मागे टाकले आहे.

ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म ‘बेट ३६५’ या कंपनीची संस्थापक आणि सीईओ असलेल्या ५३ वर्षीय डेनिसला २०२० मध्ये ४७५० कोटी रुपये पगार मिळाला आहे. ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत महिला असलेल्या डेनिसच समावेश जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांमध्ये होतो. गेल्या १० वर्षात डेनिसने ११ हजार कोटींची कमाई केली आहे. तिला बेट ३६५ मधून सर्वाधिक फायदा मिळतो. कंपनीची नेट वर्थ ३० हजार कोटी असून २०२० मध्ये या कंपनीने २८४०० कोटींचा महसूल मिळविला आहे.

शेफिल्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यावर डेनिसने वडिलांच्या गँबलिंग दुकानांच्या छोट्या चेनमध्ये हिशोबनीस म्हणून कामाची सुरवात केली होती. वयाच्या २२ वर्षी ती व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहू लागली आणि त्या काळात तिने या दुकानांची संख्या वाढविली. पण त्याचवेळी तिने हा व्यवसाय ऑनलाईनवर नेण्याचा निर्णय घेतला आणि आजची तिची कमाई ४७५० कोटींवर गेली आहे.

अल्फाबेटच्या सुंदर पिचाई यांना २१४४ कोटी, मस्क याना ३५९१ कोटी, टीम कुक यांना ९५७ कोटी तर सत्य नडेला याना या काळात ३०६ कोटी रुपये पगार मिळाला आहे. डेनिसने करोना विरुद्ध लढाई साठी ब्रिटन सरकारला १०० कोटींची मदत केली आहे.