पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या जनरल माणेकशा यांचा जन्मदिन

१९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सेनेने जो पराक्रम गाजविला तो इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षे अगोदर चीनी सेनेकडून हार पत्करावी लागल्याने भारतीय सेनेचे मनोबल खालावलेले होते. ३ डिसेंबरला पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि भारतीय सेनेने मुंहतोड जबाब देऊन अवघ्या १३ दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. या पराक्रमाचे सारे श्रेय जाते ते तत्कालीन जनरल सॅम माणेकशा यांना. ३ एप्रिल १९१३ हा त्यांचा जन्मदिवस.

भारत पाकिस्तान मधील हे एकमेव युद्ध आहे ज्यात १३ दिवसात पाकिस्तानच्या ९० हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. इतकेच नव्हे तर या युद्धातूनच बांग्लादेशाचा जन्म झाला. विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एप्रिल मध्येच भारताने युध्द करावे अशी इच्छा होती. पण जनरल माणेकशा यांनी त्यांना ‘तुमचा हट्ट असले तर युद्ध करू, पण पराभव निश्चित आहे’ असे उत्तर देण्याचे धाडस दाखविले होते.

अमृतसर मध्ये जन्म झालेल्या सॅम याना इंग्लंड मध्ये जाऊन डॉक्टर बनायचे होते पण वडिलांनी परवानगी दिली नाही त्यामुळे रागावून त्यांनी वडिलांच्या मनाविरुध्द सैन्य भरतीची परीक्षा दिली आणि सैन्यात प्रवेश केला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्यासाठी भारतीय सेना लढत होती तेव्हा माणेकशा यांनी बर्मा मध्ये युद्धात भाग घेतला होता. तेथे त्यांना सात गोळ्या लागल्या होत्या. जपानी सैन्याविरुद्ध ते लढत होते. गंभीर जखमी होऊनही त्यातून ते सहीसलामत वाचले. त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. १९७३ मध्ये भारताचे पाहिले फिल्ड मार्शल बनण्याचा मान त्यांना मिळाला तसेच १९७२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांना गौरविले गेले होते. २००८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.