अबब! किलोला २५ हजार रू.दराने मिळते ही भाजी

spung
काश्मीर, हिमाचल व हिमालयाच्या उंच पहाडी भागात मिळणार्‍या गुच्छी या भाजीचा सीझन आता सुरू होत असून ही भाजी किलोला २५ ते ३० हजार रूपये दराने विकली जाते. असा समज आहे की ही भाजी विजांचे गडगडाट व चमचमाट होत असताना बर्फातून उगवते. स्पाँज मश्रूम या नावानेही ही भाजी ओळखली जाते. अत्यंत औषधी असलेल्या या भाजीच्या सेवनाने हृदय विकारांपासून संरक्षण मिळते असेही सांगितले जाते. ही भाजी दुर्मिळ प्रकारातील आहे त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगात हिंडणारे साधू संत व स्थानिक लोक सीझनमध्ये ही भाजी गोळा करतात व तिची विक्री करतात.१९८० च्या सिंहस्थात जुना आखाडा महंताने या महागड्या भाजीचा समावेश असलेला भंडारा सात दिवस चालविला होता व त्यासाठी ४५ लाख रूपये किमतीची ही भाजी खरेदी केली गेली होती.

जंगलातच उगविणारी ही भाजी फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांत मिळते. स्थानिक लोक ती शोधण्यासाठी या काळात जंगलातच मुक्काम ठोकतात व बड्या कंपन्या व हॉटेल्स ती हातोहात खरेदी करतात. विदेशातही या भाजीला मोठी मागणी आहे. अमेरिका, युरोप, फ्रान्स, इटली व स्वित्झर्लंड मध्ये कुल्लूच्या जंगलात सापडणार्‍या स्पंज मश्रूमला म्हणजेच गुच्छीला सर्वाधिक पसंती दिली जाते. ही भाजी डी, बी, सी व्हिटॅमिनचा मोठा स्त्रोत आहे त्याचबरोबर त्यात के व्हिटमिनही आहे.

Leave a Comment