पुण्यात सात दिवसांचा मिनी लॉकडाऊन; संचारबंदीची घोषणा


पुणे – पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होम डिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बस सेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस कोरोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.

तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे, मॉल, थिएटर्स बंद असणार असल्याची माहिती देखील आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे. शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता पुढील आठवडयात म्हणजे शुक्रवारी निर्बंधांचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

याशिवाय आयुक्त सौरभ राव म्हणाले, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणे. आरोग्य सुविधा बळकट करणे, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावे लागेल.

सध्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचे कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्येत ग्रामीण भागातूनही रूग्ण दाखल होत आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत.