मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राजेश टोपेंनी उपस्थित केले महत्वाचे मुद्दे


मुंबई : राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सध्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही भर पडत आहे. राज्य सरकारकडून अशावेळी आज महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता कमीच आहे. पण कठोर निर्बंध लावले जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय स्तरातून व्यक्त केला जात आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीत राजेश टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.

गेल्या वर्षभरात राज्यात कोरोनाबाधितांवर एका ठाराविक पद्धतीने उपचार सुरु आहे. पण आता कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा नवा स्ट्रेनही रुग्णांमध्ये आढळून येत आहे. अशावेळी रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची पद्धत नव्याने ठरवण्याची गरज असल्याचा मुद्दा आरोग्यमंत्री टोपे यांनी उपस्थित केल्यामुळे आता कोरोना रुग्णांवरील उपचाराची पद्धत काहीशी बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर राज्य सरकार भर देत आहे. अशावेळी कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांनीही कोरोना चाचणी करुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. पण राज्यात अनेक ठिकाणी कोरोना चाचणीसाठी गरीबांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. गरीबांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गर्दी नागरिकांनी टाळली आणि घालून दिलेल्या नियमांचे पालन केले, तर कोरोनाबाधितांची संख्या आपोआप कमी होईल. तेव्हा लॉकडाऊनची गरज तूर्तास तरी लागणार नाही. पण लोक स्वयंशिस्त पाळत नसल्यामुळे निर्बंध कडक करावे लागत आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. सरकारच्या हातातील सर्व आयुधे जेव्हा संपतील. बेड्स उपलब्ध नसतील, अशावेळी तेव्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय उरत नाही. पण सध्या नागरिकांनी शिस्त पाळावी, गर्दी करु नये, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.