राज्यातील महाविकास आघाडी सरकार आदर्श सरकार – संजय राऊत


मुंबई – विरोधक राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सरकारला अनेक मुद्द्यांवरून टार्गेट केले जात आहे. विरोधकांकडून सरकार अपयशी ठरल्याचे दावे केले जात आहेत. पण, महाविकास आघाडी सरकार हे आदर्श सरकार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर यावरून काँग्रेसप्रणीत युपीएला देखील संजय राऊत यांनी सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात असलेला सत्तेचा फॉर्म्युला केंद्र पातळीवर देखील UPA ने राबवायला हवा, असा सल्ला राऊतांनी दिला आहे. शरद पवारांनी UPA चं नेतृत्व करायला हवे, असे काही दिवसांपूर्वीच वक्तव्य संजय राऊतांनी केले होते. त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. या वक्तव्यावर भाजपसोबतच काँग्रेसने देखील टीका केली होती. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी केंद्रातील काँग्रेसप्रणीत युपीएला सल्ला दिला आहे.

देशाला महाराष्ट्राने एक नवा राजकीय मार्ग दाखवल्याचे राऊत म्हणाले आहेत. देशातील भाजपविरोधी पक्षांना महाराष्ट्रानेएक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असून देखील तीन वेगवेगळ्या पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवले असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. हा प्रयोग UPA ने देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देशातील २७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केला असल्याची पुस्ती देखील राऊतांनी जोडली आहे.

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची हाक दिली. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा. जय प्रकाश नारायण यांनी १९७५मध्ये सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होत. पण दुर्दैवाने आज तसे नेतृत्व देशात नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.